Thursday, June 10, 2021

कोकणचा पाऊस

कोकणातला आंबा, फणस आणि माणूस जितका लोकप्रिय आहे तितकाच इथला पाऊसही आहे बरं का...

माझी या पावसाबरोबर ची ओळख म्हणजे अगदी लहानपणीची. माझ्या चिपळूणच्या आजोळच्या घरी पडवी मधुन दिसणारा धो धो कोसळणारा पाऊस म्हणजे माझी आवडती आठवण. इतका पाऊस येऊन तो आपल्या कौलारू घराच्या आत कसा बरं येत नाही असा विचार माझ्या मनात किती वेळा डोकावत असे. 

बरं ही आठवण अगदी ठराविक वेळेची कारण आमचं आजोळी जाणं हे उन्हाळ्यातच. तेव्हा सगळीकडे रखरखीत ऊन आणि उन्हाने भाजून पिवळट केशरी झालेली भाताची शेती दिसायची. 

दुपारी १२ च्या सुमारास चिपळूण स्थानकावरून निघालेली बस १-१.३० वाजता आमच्या गावाच्या वेशीवर थांबायची आणि तिथून १-२ किलोमीटर चा चालण्याचा प्रवास नकोसा वाटत असे.   

इतका कोरडा प्रदेश २-३ दिवसाच्या पावसाने हिरवागार कसा होत असेल बरं हे कोड कधी माझ्या लहानग्या डोक्याला सुटतच नसे. 


तिथल्या धो धो पावसाने व्हाळ भरून वाहायला लागल्यावर त्यातलं पाणी काचेसारख दिसायच आणि त्यातले लहान मासे पाय बुडवले की पायाला गुदगुल्या करत ते साफ करायचे. अलीकडे मॉल मध्ये किती तरी पैसे देऊन हेच सुख अनुभवायचा अतोनात प्रयत्न अनेक लोक करत असतात पण त्या हिरवळीतला तो अनुभव दुर्मिळच.

व्हाळातल्या कपारीत लपलेल्या कूर्ल्या म्हणजेच खेकडे पकडायला सावध नजर आणि कौशल्यच हवे. हे तिथल्या स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षे अवगत केले आहे. कुर्ली पकडायला जाणे हा तिथला एक adventure sport च म्हणा ना. 

बरं व्हाळातले पाणी प्यायला वापरत का नाहीत याचं उत्तर माझ्या सारख्या घाटावरच्या मुलीला इथे राहायला लागल्यावरच कळाले. 


सिंधुदुर्गातला पाउस तर अजून विलक्षण. कधी दिवस-दिवस भर आभाळ भरून गरजणारा तर कधी हलका हलका ऊन पावसातला. 

पाऊस पडून गेला की आजूबाजूचे रस्ते हिरवेगार करणारा आणि विहिरी पाण्याने तुडुंब भरून टाकणारा.


याच पावसानंतर किती तरी विलक्षण किडे पुन्हा एकदा वार्षिक जन्म घेतात. त्यांचं आयुष्य किती फार तर फार एक दोन दिवसांच पण तरीही इकडे तिकडे उडून, दिव्याभोवती घोटाळून ते आपल्या जीवाची मुंबई करतात असं म्हणायला हरकत नाही. 

रात्रीच्या प्रवासात याच हिरवळीत लुकलुकणारे काजवे तर आकाशातल्या चांदण्यांनाही लाजवतील. 

आपला वेगळाच आवाज करून लहान मोठे बेडूक आपल्या प्रेयसीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. 


कधी कधी एक वेगळाच पाऊस पडत असतो जो न आवाज करता फक्त वाळू हातातून निसटत असल्यासारखा भुरभुरत राहतो. त्याच्या शांततेत लक्ष झाडे वाऱ्यावर डुलत शांतपणे आपली कामे करीत राहतात.


ह्याच सुरुवातीच्या पावसाने एकदा का आपापली जमीन ओलावली की नांगरणी आणि पेरणी केली जाते. त्यातून उगवलेला तरवा म्हणजे तांदळाच्या रोपांच्या पेंड्या बांधल्या जातात. नंतर च्या सातत्याने पडणाऱ्या पावसाने कोपरे भरले की मग भात लावणीची तयारी करायला बाया माणसे सरसावतात. 

कधी कधी दुपारच्या उन्हाने कोमट झालेल्या चिखलात गुडघाभर पाण्यात एक एक भाताची काडी लावून झाल्यावर त्या रांगेला बघून एखाद्यानं फुटपट्टीने मोजून लावणी केली आहे की काय असे वाटेल. 

भर पावसातही आपली इरली, घोंगडी, काठी घेऊन लोक आपलं काम करत असतात. इतकी काटक की हा पाऊस त्यांना थंडी-तापाची आठवणही होऊ देत नाही. 


उन्हाळ्यात रुक्ष अशा या जमिनी पावसाळ्यात एखादा तलाव असावा तशा भरून जातात. गेल्या वर्षात इकडे तिकडे पडलेल्या प्रत्येक बी-बियाण्याला जगवतात. जंगलात ही उन्हाळ्यात लपून राहिलेल्या अळंब्या हळू हळू डोकावू लागतात आणि त्या शोधायला जाण्याची मोहीम ही सुरू होते. पावसाळ्यात पहिल्या वाफेच्या भाताबरोबर वाटप घातलेलं हे अळंबीच कालवण म्हणजे स्वर्गसुख. 


या पावसाने घराभोवती येणारे रान म्हणजे गवती सापासारख्या अनाहुत पाहुण्यांना निमंत्रण म्हणून दर वर्षी रान नडणे म्हणजे जमीन साफ करण्याचा कार्यक्रम निश्चित. 

ते चिवट रान पाऊस येईल तसे पुन्हा पुन्हा येत राहते, पण त्याला सफाचट करणारी माणसे देखील तितकीच चिकाटीची. 


कोकण आणि कोकणच्या पावसाने इथल्या माणसांना अगदी हवं ते आणि गरजे इतकं वैभव दिलं आहे. इथली संस्कृती ह्याच पावसाने समृद्ध होत आली आहे. उन्हाळ्यात लाही लाही झाल्यानंतर याच पावसाची सुखद लहर ४-५ महिने तरी जीवाला थंडावा देते. कठीण समय संपल्यानंतर येणाऱ्या समृद्धीची ग्वाही देते. 


पावसाच्या प्रेमात तर मी आधी सुद्धा होते पण शहरी भागातल्या पावसापेक्षा एक वेगळाच अनुभव देणारा कोकणचा पाऊस मात्र वेगळीच अनुभूती देऊन जातो.