Monday, February 28, 2022

हिजाब आणि शिक्षण

 कर्नाटकात हिजाब घातलेल्या मुलींना शाळेत येण्यास बंदी

शाळा, महाविद्यालये पुढील सुनावणीपर्यंत बंद 
हिजाबचा वाद हिंदू राष्ट्रापर्यंत

गेले काही महिने अशा अनेक बातम्यांनी बरीच खळबळ माजवली होती. हे सगळं एैकताना बऱ्याच गोष्टी आठवल्या. 

माझ्या शाळेत एक मुस्लिम मुलगी होती जिचे आई वडील उच्चशिक्षित होते . ती एकदा कोणत्यातरी गावी गेलेली असताना तिथे एक लहान मुलगी बुरखा घालण्यासाठी रडत होती यावर आम्ही एकदा बोललो होतो. 
तिच्या आई वडीलांना हिजाब किंवा बुरख्याची प्रथा अतिशय बुरसटलेली वाटायची. तिला इतरही काही बंधने नसत जी मुस्लिम मुलींना पाळावी लागत. ती बाकिच्या मुलींसारखीच शाळेत गणवेश घालून यायची. आमच्यासारखीच ती इतर मुलांबरोबर बोलायची. ईदला आम्ही सर्व तिच्या घरी जायचो. 

अशीच माझ्या कॅालेज मधील एक मैत्रीण रोज बुरखा घालून यायची. तिच्या घरचे उच्चशिक्षित नसले तरी त्यांच्या मुलींनी शिक्षण घ्यावं असं त्यांच ठाम मत होतं. 

मी शाळेत असताना माझ्याबरोबरची अनेक मूली, मुले गळ्यात गंडे, दोरे, हातात कडं, रूद्राक्ष,  कपाळावर विभूती, गंध, अष्टगंध, वाढदिवस असेल तर नाम, नुकतीच राखी पौर्णिमा होऊन गेली असेल तर राख्या, फ्रेंडशिप बॅन्ड, देवाच्या अंगठ्या, सोन्याच्या अंगठ्या असं सगळ घालून यायचे. 
शाळेचा गणवेश अव्यवस्थित असेल तर शिक्षक ओरडायचे पण गणवेशाव्यतिरिक्त असलेल्या गोष्टींचा त्याना फारसा फरक पडायचा नाही. कारण ते स्वतः सुद्धा अशा तत्सम गोष्टी घालून शाळेत यायचे. 
बालवयात आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. 
एखादा गंडा घातला कि सगळं नीट होईल. गंध लावून परिक्षेला गेलो कि पेपर चांगला जातो अशा काही भाबड्या कल्पना आपले पालक सुद्धा आपल्या डोक्यात भरवत असतात. 

जेव्हा हिजाब, टर्बन या गोष्टी शाळेतून हद्दपार करण्याच्या गोष्टी सुरू आहेत तेव्हा इतर धर्म सुद्धा या अतिरिक्त गोष्टींशिवाय आपल्या मूलांना शाळेत पाठवायला तयार आहेत का? आणि नसतील तर मग काय फक्त हिजाब, टर्बनच शालेय शिस्तीच्या मध्ये येतोय का? 
आणि येतोय तर तो इतके वर्ष का येत नव्हता याचा देखील विचार व्हायला हवा. गेल्या काही वर्षात वाढलेली असहिष्णूता पुढच्या किती पिढ्यांच किती नुकसान करणार आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. विविधता जपू अशी प्रार्थना करणारे आपण कुठल्या मार्गावर चालत आहोत याचा देखील विचार केला पाहिजे. 

शाळेत एका वर्गात असताना तो भगवा, मी हिरवा या गोष्टींचा विचारच आम्ही केला नाही. आपापल्या धर्मातील अनेक वेगवेगळ्या प्रथांबद्दल चर्चा करत असू. पण एखाद्याच्या घरी कुठला देव मानला जातो यावरून त्याला ठराविक श्रेणीत टाकणे या गोष्टी क्वचितच होत असत. आणि कोणी असे करत असेल तर त्या गोष्टीला शिक्षक विरोध करायचे जेणेकरून या गोष्टी मुळातच ठेचल्या जातील. 
आजच्या घडीला शाळेचे शिक्षक, हेडमास्तर गेटवर मुलींना, शिक्षिकांना बुरखा काढून यायला सांगतानाचे दृश्य आपल्यातला सामाजिक दुरावा दर्शवते. 
एकिकडे काही वर्षापूर्वीच शाळेत ओम, आणि तत्सम धर्मवाचक उद्गारांची सर्व मुलांवर सक्ती करण्याच्या बातमीची दखल भारतात नव्हे कर बाहेरच्या देशांनी घेतली होती. 
म्हणजे ही सक्ती शाळेत चालते पण एका व्यक्तीने बुरखा घातला तर शाळेची शिस्त भंग होते. 

हा विषय तसा बऱ्याच प्रमाणात चर्चिला जातोय. कोर्ट कचेऱ्या होतायत. पण या गोष्टीचा सर्वाधिक परिणाम त्या विद्यार्थ्यांवर होतोय जे गेटच्या बाहेर उभे आहेत. आधीच धर्म हा संवेदनशील विषय आहे. जेव्हा धर्म आणि इतर गोष्टी अशा प्रकारे समोर येत असताना त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल ह्याची जबाबदारी कोणाची आहे?